‘सेक्स’ याविषयाबद्द्ल कुतुहल खुप असते मात्र त्याबाबत आजही भारतीय प्रगत समाजात बोलताना संकोच हा असतोच . ‘सेक्स’ हा अतिशय आनंददायी प्रवास आहे .मात्र आकर्षणातून किंवा दडपणातून सेक्स करण्याचा हट्टास करु नका. त्यासाठी तुम्ही दोघेही शारिरिक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्यादेखिल तयार असणे फार गरजेचे आहे.
1) सर्वप्रथम संरक्षण
‘सेक्स’ चा पहिल्यांदा अनुभव घेणार्यांसाठी सुरक्षा पाळणे हे फार महत्त्वाचे आहे. यामुळे फक्त अनावश्यक गर्भधारणाच नव्हे तर लैंगिक आजारापासून देखील तुमचे रक्षण होते. सुरक्षिततेसाठी तुम्ही कंडोम , गर्भनिरोधक गोळ्या यासारखे पर्याय निवडू शकता. ऐनवेळी धावपळ करण्याऐवजी या वस्तूंची पुर्वतयारी करुन ठेवा. म्हणजे तुम्ही ‘त्या’ क्षणांचा सुखद अनुभव घेऊ शकता. पुरुषांना कंडोम घालणे गैरसोयीचे वाटत असल्यास स्त्रीयांनी गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्यात म्हणजे अनावश्यक गर्भधारणा टाळता येते. स्त्रीयांनी गर्भनिरोधक गोळ्या निवडण्यापुर्वी हे जाणुन घेणे गरजेचे आहे – गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
2) प्रत्येक स्त्रीला रक्तस्त्राव होत नाही
भारतात स्त्रीचे पावित्र्य (virginity) हा अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनवला जातो. व तीचे पावित्र्य ओळखण्याची कसोटी म्हणजे पहिल्यांदा संभोग करताना रक्तस्त्राव होतो की नाही. मात्र यात फारसे तथ्य नाही. पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्रीला रक्तस्त्राव होतोच असे काही नाही. कारण स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी असलेला ‘हायमेन’ नामक अतिशय नाजुक पडदा (tissue) धावणे, सायकल चालवणे, उड्या मारणे किंवा अगदी स्विमिंग सारख्या व्यायाम प्रकारातूनही अगदी सहज फाटू शकतो. तर काही जणींमध्ये हा पडदा जन्मजातच नसतो. त्यामुळे रक्तस्त्रावाचा स्त्रीच्या पावित्र्याशी संबंध लावणे टाळा. जर तुम्हाला काही शंका असल्यास त्याविषयी सेक्स करण्यापुर्वीच मोकळेपणाने बोला.
3) व्हर्जिनिटीचा बाऊ नको
जर तुम्ही दोघेही व्हर्जिन असाल ,तर पाहिल्यांदा सेक्स करताना थोडासा संकोच वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे घाई करण्याऐवजी एकमेकांना समजून घेत ‘त्या’ क्षणांचा आनंद घ्या. काही वेळेस जोडीदारापैकी एक जण व्हर्जिन असण्याची शक्यता असते अशावेळेस त्यांना समजुन घेण्याचा प्रयत्न करा. जर स्त्री व्हर्जिन असेल तर तसे उघडपणे तुमच्या जोडीदाराला सांगा. एकमेकांना समजून घेतल्यास गोष्टी सोप्या होतील. जर ‘तिने’ ऐनवेळेस माघार घेतली तर तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती तुम्हाला नाकारत नसून कदाचित यासार्यासाठी तीची मानसिक व बौद्धिक तयारी नसेल. असा विचार करा.
4) ‘वेदना’ अडथळा ठरु नयेत
पहिल्यांदा सेक्स करताना वेदना होणं अगदीच स्वाभाविक आहे, काही वेळेस रक्तस्त्रावदेखील होऊ शकतो मात्र यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक स्त्रीसाठी ‘वेदना’ या वेगवेगळ्या असू शकतात मात्र त्यामुळे दडपण आल्यास परिस्थिती अधिकच बिघडू शकते. सुरवातीला काही काळ जाणवणारा हा त्रास कालांतराने कमी होतो व तुम्ही सुखाने ‘त्या’ क्षणांचा आनंद घेऊ शकता. महिलांनी योग्य लुब्रिकेंट्सचा वापर केला तर ‘संभोग’ कमी त्रासदायक व सहज होण्यास मदत होते. जर महिला योनीच्या शुष्कतेनं पीडित असतील तर विना लुब्रिकेंट्स सेक्स करणे त्रासदायक ठरू शकते.
5) कामक्रीडा देखील महत्त्वाची !
प्रत्यक्ष सेक्स करण्यापुर्वी जोडीदारासोबत केलेली कामक्रीडा तुम्हाला फार मदत करू शकते. तुमच्या स्वभावानुसार, क्षमतेनुसार कामक्रीडा करा व तुमच्या जोडीदाराला काय रुचतेय हे समजून घ्या. एखादे चुंबन, स्पर्श किंवा जोडीदाराला मिठीत घेणे यापैकी काहीही कामक्रीडेचा एक भाग असू शकतो. यामुळे वातावरण निर्मिती होण्यास मदत होईल. जर तुम्ही पहिल्यांदा सेक्स करत असाल तर कामक्रीडा व दोघांमधील मोकळा संवाद फार गरजेचा आहे.
6) सेक्स करण्यापुर्वी आंघोळ करावी का?
पहिल्यांदा सेक्स करणार्यांच्या मनात सेक्स करण्यापुर्वी आंघोळ करावी की करू नये ? , बेडवर दोन चादरी घालाव्यात का ? त्या नंतर बदलाव्यात का ? असे एक ना अनेक शंका असतात. तर मग लक्षात ठेवा – जर तुम्ही बेडवर सेक्स करणार असाल तर रक्तस्त्राव झाल्यास चादर बदलावी लागेल. अन्यथा त्याची गरज नाही.
सेक्स करण्यापुर्वी गरम पाण्याने आंघोळ करणे फायदेशीरच आहे. यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटण्यास मदत होईल तसेच तुमची गुप्तांग देखील स्वच्छ राहतील. सेक्सनंतरदेखिल अवश्य आंघोळ करा. यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
7) योग्य वातावरण निर्मिती करा
स्त्री असो वा पुरूष प्रत्येकाला आपल्या जीवनात काही लक्षात राहत असेल तर आयुष्यातील सगळ्यात पहिल्यांदा केलेला संभोग. ही गोष्ट एका सर्वेक्षणात समोर आली आहे. त्यामुळे पहिल्या वहिल्या सेक्सच्या अनुभवाबाबत प्रत्येकाच्या काही रंजक कल्पना असतात मात्र काही वेळेस प्रत्यक्षात पहिला सेक्स त्रासदायकसुद्धा ठरु शकतो म्हणूनच परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्या.
पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी रोमॅन्टिक व सुश्राव्य संगीत लावा. तुमच्या अवतीभवती सुगंधी मेणबत्त्या लावणेदेखील तुमच्या फायद्याचे ठरु शकते. जोडीदाराशी मोकळा संवाद करणे हा योग्य वातावरण निर्मितीचा एक सहज ,सोपा मार्ग आहे. पॉर्नसाईट किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या वैयक्तिक अनुभवानुसार वाहवत जाऊ नका. कारण ‘सेक्स’चा अनुभव हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असतो. त्यामुळे तुम्ही तुमचा योग्य मार्ग निवडा व ‘त्या’ क्षणांचा सुखद अनुभव घ्या.
संबंधित दुवे- ‘सुरक्षित सेक्स’चा नेमका काळ कोणता ?
छायाचित्र सौजन्य – Getty Images
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या .